मुंबई : भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने वोटचोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली. बिहार आणि बंगालमध्येही मतदारांची नावे वगळून भाजपने विजय मिळवला. मतदार यादी पुनरिक्षणाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, प्रकाश मेहतांपासून तानाजी सावंतांपर्यंत या सरकारमध्ये शंभरहून अधिक घोटाळे झाले आहेत. मात्र सरकार स्वतःच्या लोकांवर कोणतीही कारवाई करत नाही. निष्पक्ष आणि प्रामाणिक चौकशी झाली तर सरकारमध्ये सहभागी असलेले अनेकजण गजाआड जातील. वडेट्टीवार यांनी शेतकरी प्रश्नावर सरकारला धारेवर धरत म्हटले की, हे सरकार पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली रक्कम भरण्याची ताकद शेतकऱ्यांकडे राहिलेली नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत असताना सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. ते पुढे म्हणाले, राष्ट्रभक्तीच्या नावाखाली धार्मिक आणि जातीय विभाजन निर्माण करून देशाला लुटण्याचा उद्योग भाजपने सुरू केला आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे पुढे केले जात आहेत.