रायगड : बौद्धजन पंचायत समितीचे माजी अध्यक्ष, बौद्ध समाज युवा संघ रायगडचे ज्येष्ठ मार्गदर्शक,बहुजन समाजाचे ज्येष्ठ नेते आणि बुद्ध, कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारधारेचे सच्चे पाईक यशवंत हिरु शिंदे (शिंदे सर) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी दि. (26) रोजी वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने आंबेडकरी व बहुजन चळवळीवर शोककळा पसरली असून समाजाचा एक लढवय्या, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या पच्छात चार मुले, सुना, नातवंडे, व मोठा परिवार आहे. शिंदे सर हे केवळ राजकीय किंवा सामाजिक पदांपुरते मर्यादित नव्हते, तर ते सर्वसामान्यांच्या मनातील विश्वासाचे नाव होते. अत्यंत प्रेमळ, मनमिळावू आणि संवेदनशील स्वभावामुळे त्यांनी हजारो कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. कोणाच्याही सुखदुःखात ते आपुलकीने सहभागी होत असत. त्यामुळेच त्यांच्याविषयी समाजात विशेष आदर आणि आत्मीयता होती. संविधानिक मूल्ये जपत, लोकशाहीच्या बळकटी साठी ते अहोरात्र झटले.

“माणूस म्हणून जगताना समाजासाठी झटणारा एक हृदयस्पर्शी नेता आज आपल्यात नाही,” अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिवंगत यशवंत शिंदे यांचे जलदान विधी व शोकसभा रविवारी दि. 7 जून 2026 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह सिद्धार्थ नगर रोहा येथे ठीक 11 वाजता होणार असल्याची माहिती शिंदे कुटुंबियांनी दिली.