खेड (प्रतिनिधी) : – दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यात वाढत्या विजेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवीन विद्युत उपकेंद्रांच्या उभारणीची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तातडीने प्रशासकीय मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
सध्या या भागातील विद्युत वितरण व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात अतिरिक्त भार येत असून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. वाढती निवासी व औद्योगिक वीज मागणी लक्षात घेता नवीन उपकेंद्रांची आवश्यकता निर्माण झाल्याचे योगेश कदम यांनी पत्रात नमूद केले आहे.दापोली तालुक्यातील टाळसुरे येथे २२०/३३ के.व्ही. क्षमतेचे अति उच्चदाब विद्युत उपकेंद्र उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे. हे उपकेंद्र सन २०२६-२७ ते २०३५-३६ च्या एसटीयू योजनेअंतर्गत प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले आहे.
याशिवाय, परिसरातील तांत्रिक अडचणी व अतिभारित वीजप्रवाह कमी करण्यासाठी आणखी पाच नवीन ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्रांची उभारणी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये दापोली तालुक्यातील वळणे एमआयडीसी आणि आसूद, तसेच खेड तालुक्यातील नातूनगर, फुरूस आणि शिवतर येथील प्रस्तावित उपकेंद्रांचा समावेश आहे.
या पाच उपकेंद्रांसाठी सुमारे ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणीही योगेश कदम यांनी केली आहे. दरम्यान, या नवीन उपकेंद्रांच्या उभारणीमुळे दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत होणार असून नागरिकांसह उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे