मंडणगड : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील कोंडगाव येथे चारित्र्याच्या संशयातून एका विवाहितेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश निलेश पवार (वय २५, रा. कोंडगाव, ता. मंडणगड) याला पत्नी वैशाली मंगेश पवार (वय २२) हिच्याबाबत संशय होता. या संशयातूनच ६ जून रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर घरासमोरील चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या वैशालीवर मंगेशने धारदार कोयत्याने डोक्यावर वार केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात वैशाली गंभीर जखमी झाली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी रामभाऊ सखाराम पवार (वय ६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मंगेश पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे कोंडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.