सिंधुदुर्ग : तिलारी धरण परिसरात अवैधरित्या सुरू असलेली चरस-गांजाची शेती आणि मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या माती उत्खननावर (मायनिंग) स्थानिक आमदारांचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे आमदार दीपक केसरकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

जिल्ह्यातील युवा पिढीला चरस-गांजाच्या व्यसनापासून वाचवणे हे लोकप्रतिनिधींचे प्रमुख कर्तव्य आहे. मात्र या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आमदारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असे मत व्यक्त करण्यात आले. पालकमंत्री आणि फडणवीस सरकार हे दीपक केसरकर यांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप करण्यात आला. प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार वाढती महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

गॅस सिलिंडरचे दर हजार रुपयांच्या आसपास पोहोचल्याने महिला आणि सर्वसामान्य कष्टकरी वर्गाला घरखर्च चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे गॅस योग्य दरात आणि वेळेत उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील बेकायदेशीर मायनिंग आणि गांजा प्रकरण तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

पोलीस आणि प्रशासनाने पाहणी करूनही कोणतीही कारवाई केली नसल्याने सामान्य नागरिकांमधूनही राजीनाम्याची मागणी होत असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला.