लांजा : महावितरणच्या भोंगळ कारभाराला कंटाळून तळवडे येथील शेकडो ग्रामस्थांनी मंगळवारी रात्री थेट लांजा येथील महावितरण कार्यालयावर धडक देत तीव्र संताप व्यक्त केला. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, त्यातून विद्युत उपकरणांचे होणारे नुकसान, पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम आणि अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कार्यालयात धडक दिली.

लांजा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा फटका बसत आहे. अशातच तळवडे गावात गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. मंगळवारी रात्री मोठ्या संख्येने ग्रामस्थ महावितरण कार्यालयात दाखल झाले. मात्र, तक्रारींचे कारण ठरलेले संबंधित सहाय्यक अभियंता कार्यालयात उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांचा संताप अधिकच वाढला.

परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे लक्षात येताच महावितरण प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगळे आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढली. त्यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी संयमाची भूमिका घेत चर्चा करण्यास सहमती दर्शविली.