चिपळूण : पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने चिपळूण नगरपरिषद आणि चिपळूणकर नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून “वृक्ष संग्रहालय – घनराई” हा अभिनव आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम साकारण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू झाली आहे. भारतातील सुमारे २०० विविध दुर्मिळ, औषधी, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण वृक्षप्रजातींचे एकाच ठिकाणी संवर्धन आणि प्रदर्शन करणारा हा प्रकल्प कोकणातीलच नव्हे तर राज्यातील एक आगळावेगळा उपक्रम ठरणार आहे.

या संकल्पनेला चिपळूण नगरपरिषदेच्या सभागृहात नगरसेवक श्री. फैसल कास्कर आणि श्री. शशिकांत मोदी यांनी मांडणी करताच नगराध्यक्ष श्री. उमेश सकपाळ तसेच चिपळूण नगरपरिषदेच्या सर्व नूतन नगरसेवकांच्या कार्यकारिणीने एकमुखाने सकारात्मक पाठिंबा दर्शविला. पर्यावरण संरक्षणासाठी दीर्घकालीन परिणाम घडवून आणणाऱ्या या योजनेचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले असून, तिच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी कटिबद्धता व्यक्त केली आहे.

या प्रकल्पासाठी नियोजित असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदान, राधाकृष्ण नगर, बहादूरशेख नाका येथे नुकतीच प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, कर्मचारी बापू साडवीलकर, मंगेश पेढांबकर, बाळा आंबुर्ले, या संकल्पनेचे आरेखक श्री. पराग वडके, तसेच नगरसेवक श्री. फैसलजी कास्कर, श्री. शशीकांतजी मोदी आणि श्री. अजय भालेकर उपस्थित होते.याचबरोबर पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेले अजित जोशी, शहनवाझ शहा, समीर कोवळे, भाऊ काटदरे, बापू काणे यांच्यासह अनेक निसर्गप्रेमी कार्यकर्ते आणि नागरिकही या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. या उपक्रमाबाबत उपस्थितांनी उत्साह व्यक्त करत विविध सूचना आणि कल्पना मांडल्या.