रत्नागिरी : मराठी अस्मिता, हिंदुत्व, स्वाभिमान आणि संघर्षाच्या सहा दशकांच्या अखंड प्रवासाचे प्रतीक असलेल्या शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेत उत्साहपूर्ण वातावरणात हिरक महोत्सव साजरा करण्यात आला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या गौरवशाली वाटचालीला अभिवादन करत शिवसैनिकांनी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसेना सचिव तथा माजी खासदार आदरणीय विनायकजी राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्री सत्यनारायणाची महापूजा भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. या मंगल सोहळ्यात पक्षाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, संघटन अधिक बळकट होण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. महापूजेनंतर उपस्थित शिवसैनिकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वृद्धिंगत करण्याचा निर्धार व्यक्त केला. वर्धापन दिनानिमित्त आयोजित या धार्मिक व संघटनात्मक कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
