लोटे : पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभरात प्रशासन सतर्क झाले असून, रत्नागिरी जिल्ह्यातही उत्पादन शुल्क विभागाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील दुर्घटनेत मिथेनॉलचा वापर झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित रसायनांचे उत्पादन, साठवण आणि वापर यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती ऑरगॅनिक कंपनीची विशेष तपासणी केली. गुरुवारी झालेल्या या तपासणीत कंपनीतील रसायनांची साठवणूक, सुरक्षितता उपाययोजना, नोंदवही व्यवस्थापन तसेच नियमांचे पालन याची पाहणी करण्यात आली.
यावेळी अधीक्षक शेडगे यांनी कंपनी व्यवस्थापनाला शासनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या सक्त सूचना दिल्या. मिथेनॉलसारख्या संवेदनशील रसायनांच्या हाताळणीत कोणताही निष्काळजीपणा किंवा नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. पुण्यातील दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये तपासण्या सुरू करण्यात आल्या असून, रसायनांचा गैरवापर रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वयाने कारवाई केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक उद्योगांवर प्रशासनाचे विशेष लक्ष असून, पुढील काळात अशा तपासण्या अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहेत.