चिपळूण : चिपळूण येथील सुप्रसिद्ध संवादिनी (हार्मोनियम) वादक हर्षल प्रसाद काटदरे यांची यावर्षीच्या प्रतिष्ठेच्या नटश्रेष्ठ बालगंधर्व संस्थेच्या ‘खाऊवाले पाटणकर’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान केला जात असून, बालगंधर्व यांच्या पुण्यतिथीनिमित्त १५ जुलै रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित समारंभात त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
बालगंधर्व यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांच्या नातेवाईक व हितचिंतकांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या नटश्रेष्ठ बालगंधर्व संस्थेतर्फे दरवर्षी संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले जाते. गतवर्षी हा पुरस्कार चिपळूणचे ज्येष्ठ गायक स्वराधिराज राजाभाऊ शेंबेकर तसेच प्रसिद्ध गायक महेश काळे यांना प्रदान करण्यात आला होता.
हर्षल काटदरे यांनी संवादिनी वादनाचे प्राथमिक धडे त्यांचे वडील प्रसाद काटदरे तसेच राजाभाऊ शेंबेकर यांच्याकडून घेतले. त्यानंतर पं. विश्वनाथ कान्हेरे आणि पं. प्रमोद मराठे यांच्याकडे त्यांनी वादनाचे सखोल शिक्षण घेतले. त्यांनी पुणे विद्यापीठातून संगीत विषयात बी.ए. पदवी, तर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून एम.ए. पदवी संपादन केली आहे.
काटदरे यांना सन २०२० मध्ये चतुरंग प्रतिष्ठानच्या म्हैसकर फाऊंडेशनतर्फे चतुरंग शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली होती. संगीत नाटकांच्या क्षेत्रात त्यांनी ऑर्गन साथीची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली असून, त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना हर्षल काटदरे म्हणाले की, “माझ्या यशाचे श्रेय माझे आई-वडील, गुरुजन आणि श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, मार्कंडी (चिपळूण) यांना जाते. बालपणापासून मठातील भजनसेवेमुळे संगीताची आवड निर्माण झाली आणि संवादिनीशी माझे नाते जुळले. स्वामी समर्थांची कृपा सदैव माझ्यावर राहो, हीच प्रार्थना आहे.