गुवाहाटी : आसाममधील जोरहाट एअरबेसवर भारतीय हवाई दलाच्या AN-32 मालवाहू विमानाचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत हवाई दलाच्या पाच जवानांना वीरमरण आले आहे. लँडिंगदरम्यान विमान कोसळून त्याचे दोन तुकडे झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात को-पायलट बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर भारतीय हवाई दलाने तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विमान जोरहाट एअर स्टेशनवर उतरण्याच्या तयारीत असताना अचानक दुर्घटनाग्रस्त झाले. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की विमानाचे दोन तुकडे झाले. या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जेंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांना वीरमरण आले.
भारतीय हवाई दलाने अधिकृत निवेदन जारी करत शोक व्यक्त केला आहे. वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत या कठीण प्रसंगी हवाई दल त्यांच्या कुटुंबीयांसोबत खंबीरपणे उभे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी तांत्रिक बिघाड, इंजिन निकामी होणे किंवा प्रतिकूल हवामान या शक्यतांचा तपास केला जाणार आहे. यासाठी हवाई दलाने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश दिले आहेत. अपघातातून बचावलेला को-पायलट चौकशीतील महत्त्वाचा दुवा ठरणार असून, अपघातावेळी कॉकपिटमध्ये नेमके काय घडले याबाबत त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
