लोटे :- खेड तालुक्यातील लोटे माळवाडी येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा लोटे माळ येथे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा केला गेला. काल सोमवार दि.१५ रोजी खेडचे तहसीलदार श्री सुधीर सोनवणे यांच्या उपस्थितीत नवागतांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. या प्रवेशोत्सवा दरम्यान जिल्हा परिषद शाळा प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करताना ते बोलत होते.
मानवी जीवनातील चार आश्रमांपैकी अतिशय महत्त्वाचा आणि पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याश्रम. या काळात विद्यार्थी गुरुकुलात जाऊन ज्ञान आणि चारित्र्याची शिकवण घेतो. सध्याच्या काळात जिल्हा परिषद शाळा या गुरुकुला प्रमाणेच विद्यार्थ्यांना ज्ञान आणि चारित्र्याची शिकवण देणाऱ्या शाळा आहेत. या शाळां मुळेच आपण सर्वजण घडलो आहोत म्हणूनच या शाळा जगवण्याची आणि टिकविण्याची जबाबदारी आपली आहे, असे तहसीलदार सुधीर सोनवणे याप्रसंगी म्हणाले.शाळेमध्ये विद्यार्जनासाठी पहिले पाऊल ठेवताना या चिमुकल्यांचे शाळेतील शिक्षकांकडून औक्षण करण्यात आले. या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल शाळेच्या परिसरात कायम आठवणीत राहावे म्हणून परातीमध्ये कुंकवाचे लाल पाणी करून त्यामध्ये पहिले पाऊल उठवले गेले आणि ते पाहून स्वच्छ सफेद कागदावर उमटवून तो कागद जपून ठेवण्यात आला. या नवागत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन पहिल्याच दिवशी गणवेश आणि शालेय साहित्य दिल्यामुळे या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याप्रसंगी तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी ‘या जिल्हा परिषद शाळा जगवल्या पाहिजेत आणि येथील शैक्षणिक दर्जा सुद्धा टिकवला पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी लोटे चे सरपंच चंद्रकांत चाळके, सचिन काते, रुपेश काते, रोहन कालेकर, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि पालक उपस्थित होते.
जि. प. शाळांचे आपल्या आयुष्यात महत्त्वाचे योगदान – तहसीलदार सुधीर सोनवणे…
