दापोली (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील वेळवी-कांगवई मुख्य रस्ता ते कलानगर पद्मावती मंदिराकडे जाणारा रस्ता एका महिलेने सिमेंटचे पोल उभे करून त्यावर तारेचे कुंपण घालून पूर्णतः बंद केल्याने कलानगर गावातील वातावरण चांगलेच तापले होते. स्थानिक ग्रामस्थांचा कायमचा रहदारीचा असणारा हा रस्ता बंद केल्याने ग्रामस्थांची फार मोठी अडचण निर्माण झाली होती.
याबाबत तहसीलदार, दापोली तसेच पोलीस ठाणे, दापोली येथे रीतसर तक्रार दाखल करण्यासाठी कलानगर गावातील महिला, पुरुष व शाळेतील मुले असे शंभरहून अधिक ग्रामस्थ आज तहसीलदार कार्यालय, दापोली येथे धडकले व तहसीलदारांसमोर आपली कैफियत मांडली. तसेच, आम्हाला १०० वर्षांहून अधिक जुन्या रस्त्याचा मार्ग मोकळा करून न्याय द्यावा, अशी मागणी केली.
यावेळी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. कलानगर गावचा हा पूर्वापार वापरात असलेला रस्ता असून, या रस्त्याचे ग्रामपंचायतीकडून सन २००९-१० मध्ये खडीकरणही करण्यात आले आहे. या रस्त्याला लागून सुमारे ३५ ते ४० घरे जोडलेली आहेत. हा रस्ता बंद झाल्याने वस्तीत राहणाऱ्या दीडशेहून अधिक लोकांचे तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत.
कायम वर्दळीचा असलेला हा रस्ता एका महिलेने मनमानीपणे बंद केल्याने गावातील ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले आहेत. वारंवार होणाऱ्या या त्रासाला ग्रामस्थ आता चांगलेच कंटाळले असून, “काय व्हायचे ते होऊ द्या,” अशा भूमिकेत ते आहेत.
