मुंबई : राज्यातील प्रशासकीय फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (IAS) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. चिपळूणच्या त्या सुकन्या आहेत. त्यांची नियुक्ती आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) येथे अतिरिक्त महानगर आयुक्त पदावर करण्यात आली असून त्यांना तातडीने नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा वेग वाढला आहे. दर आठ-दहा दिवसांनी विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असून मंत्रिमंडळ बैठकीच्या आसपास मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीनंतर मुंबई महानगरपालिकेतील रिक्त झालेल्या अतिरिक्त महानगर आयुक्त पदाची जबाबदारी आयएएस अधिकारी प्राजक्ता वर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. प्रशासन अधिक गतिमान व कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने हे फेरबदल करण्यात आल्याचे सांगितले जात असून आगामी काळात आणखी काही महत्त्वाच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
