मुंबई – रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा शिरूर तालुक्याच्या अर्थव्यवस्थेची महत्त्वाची आधारवाहिनी असून, कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, लघुउद्योजक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी. कारखान्याला आवश्यक अर्थसहाय्य मिळण्यासाठी ‘एनएसडीसी’कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावातील त्रुटी तातडीने पूर्ण करून कर्ज मागणीचा प्रस्ताव नव्याने सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत आयोजित बैठकीत बोलत होत्या.

यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सहकार आयुक्त व निबंधक दिपक तावरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, राजेंद्र कोरेकर, रवी काळे, सुधीर फराटे, दादा पाटील फराटे, शशिकांत दसगुडे, राजेंद्र जगदाळे, बाळासाहेब नागवडे, स्वप्निल ढमढेरे, स्वप्नील गायकवाड, श्रीनिवास घाडगे, राजेंद्र गदादे, बाळासाहेब फराटे, महेश ढमढेरे, सोपानराव गवारी, शरदराव साठे, दादासाहेब कोळपे, कुंडलिकराव शितोळे, विरेंद्र शेलार यांच्यासह संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण शिरूर तालुक्यात असून, तालुक्यातील ९८ गावांचा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात समावेश आहे. कारखान्याचे सुमारे १९ हजार सभासद आहेत. गेल्या तीन गळीत हंगामांपासून कारखाना बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या शेतकरी, कामगार आणि इतर घटकांवर त्याचा परिणाम होत आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.