चिपळूण : अंगणवाडी हे बालकांच्या सर्वांगीण विकासाचे पहिले केंद्र असून, अंगणवाडी म्हणजे बालकांचे पहिले विद्यापीठ आहे, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कोसबी घाणेकरवाडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी अंगणवाडी केंद्रांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.

आमदार निकम म्हणाले की, अंगणवाडीमध्ये केवळ पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जात नाही, तर बालकांच्या बौद्धिक, शारीरिक, भावनिक आणि सामाजिक विकासाला चालना दिली जाते. खेळ, कृती, गोष्टी, गाणी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण केली जाते. त्याचबरोबर पोषण, आरोग्य, स्वच्छता आणि संस्कार यांची सांगड घालून सक्षम व सुसंस्कारित पिढी घडविण्यात अंगणवाडी केंद्रांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

‘बालपण हे संस्काराचे रोपटे आहे आणि अंगणवाडी हे त्या रोपट्याला फुलविणारे अंगण आहे,’ असे सांगत त्यांनी शाळेत जाण्यापूर्वीच्या वयातच मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची, सवयींची आणि शिकण्याच्या वृत्तीची पायाभरणी होत असल्याचे नमूद केले. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.