नवी दिल्ली : संपूर्ण देशाच्या उत्सुकतेचा विषय ठरणाऱ्या नैऋत्य मान्सूनचे अखेर केरळमध्ये आगमन झाले असून भारतीय हवामान विभागाने सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा केली.

उष्णता आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे. केरळच्या किनारपट्टीवर मान्सून दाखल झाल्यानंतर केरळ राज्यात पुढील काही दिवसांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतातील मान्सूनच्या प्रगतीसाठी केरळमधील आगमन हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात असल्याने देशभरातील शेतकरी, हवामान तज्ज्ञ आणि प्रशासनाचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे. मात्र महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकऱ्यांना अद्याप काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा करण्यासाठी भारतीय हवामान विभाग काही ठरावीक निकषांचा आधार घेतो. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी यापूर्वी याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार १० मेनंतर केरळमधील १४ हवामान केंद्रांपैकी किमान ६० टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस २.५ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद होणे आवश्यक असते. याशिवाय पश्चिमेकडून वाहणारे वारे ठरावीक उंचीपर्यंत आणि आवश्यक वेगाने वाहणे तसेच वातावरणातील दीर्घतरंगीय प्रारणाचे प्रमाण निश्चित मर्यादेपेक्षा कमी असणे हे निकषही पूर्ण होणे गरजेचे असते.