मंडणगड: शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत सध्याच्या राजकीय परिस्थितीसाठी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांच्यावरही निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना कदम म्हणाले, “आज पक्षावर ही वेळ का आली, याचे आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करणे गरजेचे आहे. आमदार, मंत्री आणि आता खासदारही पक्ष सोडून जात आहेत. सर्वांना ‘चालते व्हा’ म्हणण्याच्या भूमिकेमुळे मराठी माणसाचे नुकसान होत आहे.”
पुढे बोलताना त्यांनी “आता उद्धवजी, वहिनी आणि आदित्य ठाकरे तिघेच पक्षात राहणार आहेत,” असा टोला लगावला. तसेच ठाकरे गटातील काही खासदारांच्या संभाव्य निर्णयांबाबत भाष्य करताना “त्यांना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही,” असा दावा केला.
उद्धव ठाकरे यांना प्रशासन आणि कायदेशीर कामकाजाचा पुरेसा अनुभव नसल्याची टीकाही कदम यांनी केली.
संजय राऊतांवर निशाणा ;खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना रामदास कदम म्हणाले, “चाळीस आमदारांच्या पाठिंब्यावर संजय राऊत खासदार झाले. नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा का दिला नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “जगा सांगे ब्रह्मज्ञान…” असे म्हणत त्यांनी राऊत यांच्यावर बोचरी टीका केली.
भास्कर जाधवांना आव्हान ;आमदार भास्कर जाधव यांचाही उल्लेख करत कदम म्हणाले, “भास्कर जाधव तरी पक्षात राहतील का? त्यांनी शपथ घेऊन सांगावे.” तसेच “ये दिन कट जायेंगे… देखो आगे क्या होता है,” असे म्हणत त्यांनी आगामी काळात ठाकरे गटात आणखी राजकीय घडामोडी घडू शकतात, असे संकेत दिले.
रामदास कदम यांच्या या वक्तव्यामुळे कोकणातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
