चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या लोटे-परशुराम एमआयडीसीसमोर पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले असून पुढील ४८ तासांत एकामागोमाग अनेक उद्योग बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कोयना धरणातील पाणीसाठा घटल्याने वीजनिर्मिती ठप्प झाली असून त्याचा थेट परिणाम चिपळूण, लोटे आणि खेड येथील औद्योगिक क्षेत्रांच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अनेक उद्योगांच्या उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होऊ लागला आहे. काही उद्योगांनी उत्पादन क्षमतेत कपात केली असून घरडा केमिकल इंडस्ट्रीने लोटे एमआयडीसीतील आपली सर्व युनिट्स बंद केल्याची माहिती समोर आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांकडे मर्यादित पाणीसाठा शिल्लक असल्याने परिस्थिती कायम राहिल्यास उद्योग पूर्णपणे बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत उद्योगांना आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. तसेच पाणी संकटावर त्वरित तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उद्योजकांनी केली.