चिपळूण : ‘द बॉम्बे सॅपर्स’चे कर्नल कमांडंट यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण येथे माजी सैनिक (ESM), वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘वेटरन्स आऊटरीच प्रोग्राम’ (माजी सैनिक जनसंपर्क मोहीम) यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला ७०० हून अधिक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

माजी सैनिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी रेकॉर्ड ऑफिस BEG अँड सेंटर (खडकी), विविध आर्मी रेकॉर्ड ऑफिस, PAO (OR), ECHS, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, AWPO आणि इतर कल्याणकारी संस्थांद्वारे एकूण १७ स्टॉल उभारण्यात आले होते.

या स्टॉल्सच्या माध्यमातून SPARSH पोर्टलसंबंधित कामे, डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (Digital Life Certificate), पेन्शनविषयक बाबी, ECHS नोंदणी, कायदेशीर मदत, आरोग्य सेवा आणि तक्रार निवारण यांसारख्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘बॉम्बे सॅपर्स असोसिएशन’चे मानद सचिव लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस, PVSM, VSM, ADC (निवृत्त) होते. त्यांनी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी भारतीय लष्कर सदैव कटिबद्ध असल्याचे आवर्जून सांगितले. याप्रसंगी एअर मार्शल हेमंत नारायण भागवत, PVSM, AVSM, VM (निवृत्त) आणि BEG अँड सेंटर (खडकी)चे कमांडंट ब्रिगेडियर परमजीत सिंग ज्योती, SM, VSM हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा आणि योगदानाचा आदर राखत कार्यक्रमात १७ वीर नारी आणि वीर मातांचा विशेष सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्हासह प्रत्येकी १०,००० रुपये रोख पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.