मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विधी समितीच्या बैठकीत नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी मुंबई पब्लिक स्कूल (लिबर्टी गार्डन) उद्घाटन कार्यक्रमातील कथित प्रोटोकॉल उल्लंघनाबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. या चर्चेनंतर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्यस्थिती समोर येईपर्यंत राजशिष्टाचार अधिकारी संदीप लाळगे यांना निलंबित करण्याचा ठराव विधी समितीने एकमताने मंजूर केला.
बैठकीत तिवाना यांनी उद्घाटन कार्यक्रमातील राजशिष्टाचाराचे उल्लंघन, स्थानिक लोकप्रतिनिधींचा अवमान तसेच उद्घाटनाच्या कोनशिलेवरून स्थानिक नगरसेवकाचे नाव वगळण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी “सो व्हॉट?” असे मुजोर उत्तर देत महापालिका राजशिष्टाचार अधिकारी संदीप लाळगे यांनी अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत विधी समितीच्या बैठकीत नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी महापालिका राजशिष्टाचार विभागाच्या भूमिकेबाबत गंभीर आक्षेप नोंदवले. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी त्यांनी मागणी केली. तसेच, राजशिष्टाचार अधिकाऱ्यांना आधी शिष्टाचार शिकविण्याची गरज असल्याचे खडे बोल त्यांनी प्रशासनाला सुनावले.