मुंबई : मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलेल्या जनाब संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा शिवीगाळ केली. लक्षात ठेवा, हे कायद्याचे राज्य आहे. तुमच्या धमक्यांना इथे भीक घातली जाणार नाही. तुमच्या धमक्यांना महाराष्ट्र घाबरत नाही. देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत. मातोश्रीचे दरवाजे तुम्हीच बंद केलेत आणि आता आपल्याच निवडून आलेल्या खासदारांना शिवीगाळ करता ?

तुम्ही जितकी शिवीगाळ कराल तितकी जनता तुम्हाला मतरूपी शिव्या देऊन पुन्हा घरी बसवेल. जनतेने तुम्हाला याआधीही नाकारले, उद्याही नाकारतील. तुमच्या शिवीगाळीला वैतागलेले तुमचे लोक तुम्हाला सोडून जातात. येत्या काळातही याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असे खडे बोल भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी सुनावले.
पैसा फेको, तमाशा देखो, ही संजय राऊत तुमचीच संस्कृती आहे. मुळात खासदार निधीचे काय झाले, हा प्रश्न तुम्हालाही लागू आहे. 25 वर्षापासून तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात. तुमच्या खासदार निधीतून तुम्ही महाराष्ट्राच्या हिताचे एकतरी काम केले का? एकतरी शाळा बांधली का? एकतरी रस्ता केला का?, याचा हिशोब आधी द्या आणि मग इतरांना निधीबद्दल प्रश्न विचारा. मुळात एकनाथजी शिंदे यांच्यासोबत असलेले खासदार विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एनडीएसोबत आलेत. तुम्ही मात्र हिंदुत्वादाशी प्रतारणा केली, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला, हे ध्यानात ठेवा आणि आधी तुमच्या निधीचा हिशोब आधी द्या, अशी मागणी श्री. बन यांनी केली.