सावर्डे : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्ञानार्जनाबरोबरच कौटुंबिक जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि सुसंस्कार यांचा संगम असलेला विद्यार्थीच भविष्यात यशस्वी ठरतो. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या विविध शैक्षणिक सुविधा आणि संधींचा योग्य उपयोग करून संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले.

सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे नुकतीच पालक संवाद सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेला तब्बल ६९२ पालकांची उपस्थिती लाभली.

सभेच्या प्रारंभी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अशोक शितोळे यांनी प्रास्ताविक करताना पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संघटित प्रयत्नातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साध्य होऊ शकतो याची माहिती दिली. यावेळी त्यांनी विद्यालयाने गेल्या काही वर्षांत प्राप्त केलेल्या विविध यशांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” अभियानाच्या टप्पा क्रमांक १, २ व ३ मध्ये विभागस्तरावर प्रथम क्रमांक, गांधी तीर्थ जळगाव यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय “स्वच्छ शाळा सुंदर शाळा” स्पर्धेतील प्रथम क्रमांक, राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी, तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांतील यश, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा आणि विविध शैक्षणिक उपक्रमांतील उल्लेखनीय यशाची माहिती पालकांना दिली.