मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार संजय दत्त यांची हरियाणाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपवली आहे. संजय दत्त हे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव असून यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि विधान परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. हिमाचल प्रदेश व तामिळनाडूचे सहप्रभारी म्हणूनही त्यांनी याआधी काम केले आहे.
“काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेजी, विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी व वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर मोठा विश्वास व्यक्त करून ही जबाबदारी दिली त्याबद्दल मी या नेतृत्वाचा आभारी आहे. मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान शिपाई असून वरिष्ठांनी माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. हरिणात आगामी काळात पक्ष संघटना बळकट करून काँग्रेसचे सरकार आणणे व २०२९ साली राहुल गांधी जी यांना पंतप्रधान करण्यासाठी पक्षाची ताकद वाढवण्यावर आपाला भर असेल”, असे संजय दत्त यांनी म्हटले आहे.