महाड : दुर्गराज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा हजारो शिवभक्तांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत दिमाखात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले, गृह राज्यमंत्री योगेश कदम, गोवा सरकारचे मंत्री सुभाष देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि हजारो शिवभक्त उपस्थित होते.

प्रारंभी कोकण कडा मित्र मंडळाचे संकेत वडके व निलेश सकट यांनी सपत्नीक राज्याभिषेक विधी पार पाडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला.

दोन दिवस विविध कार्यक्रमांनी रंगला सोहळा
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी प्रास्ताविक केले.
शुक्रवार, २६ जून रोजी जगदीश्वर व वाडेश्वर मंदिराच्या पूजनाने सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर शिवतुलादान, पारंपरिक गोंधळ, शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.