चिपळूण : पारंपारिक कोकणी खाद्यसंस्कृतीची अनोखी झलक सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) ता.चिपळूण हे उपक्रमशील विद्यालय आहे. विद्यार्थ्यांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले जाते . आनंददायी शनिवार अंतर्गत कोकण महोत्सवाचे विद्यालयात आयोजन करण्यात आले होते . कोकण महोत्सवात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला .

कोकणातील खादयसंस्कृती, परंपरा आणि खाद्यवैविध्य यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने कोकण महोत्सव या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात आंबा, फणस, काजू, आळू , जांभूळ, करवंद, तोरण, रातांबे इ . फळे मांडण्यात आली होती .
विद्यार्थ्यांनी आता उपलब्ध होणारी फळे , रानमेवा , त्यापासून तयार होणारे पदार्थ आकर्षक पद्धतीने मांडले होते . कोकणातील पारंपरिक पदधतीने बनवले जाणारे फणसाचे पदार्थ, आंब्याचे विविध पदार्थ, कोकम , गोड कोकम, आंबापोळी, फणसपोळी इ खाद्यपदार्थानी विशेष लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक पदार्थाची माहिती आत्मविश्वासाने सांगून आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकता, संवादकौशल्य, नियोजन आणि संघभावना यांचे प्रत्यक्ष शिक्षण या उपक्रमामुळे मिळाले. पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती संवर्धन , आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित होत असल्याचे सांगितले. या उपक्रमाचे आयोजन अपूर्वा शिंदे, वृषाली राणे व शितल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते . शाळेचे मुख्याध्यापक श्री सकपाळ सर व शिक्षकवृंदांच्या सहकार्याने हा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.