चिपळूण (प्रतिनिधी):- प्राथमिक आरोग्य केंद्र, सावर्डे येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत १ ते ५ वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे उदघाटन आ. शेखर निकम यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या पूजा शेखर निकम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव मॅडम, प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुबीना नायकवादी, पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, शरद शिगवण तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“पोलिओमुक्त भारत ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक बालक निरोगी राहावे, यासाठी शासनाची ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. पोलिओचे दोन थेंब हे बालकांच्या उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी संरक्षण कवच आहेत. कोणतेही बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये. पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य विभागाला सहकार्य करावे आणि प्रत्येक मोहिमेत आपल्या मुलांना पोलिओचे डोस द्यावेत.”
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत पोलिओचे दोन थेंब पूर्णपणे सुरक्षित असून ते बालकांना आयुष्यभर अपंगत्वापासून संरक्षण देण्यास मदत करतात. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला वेळेत पोलिओ डोस देऊन पोलिओमुक्त भारताच्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आ. निकम यांनी केले आहे.
