चिपळूण : कोणतीही सत्ता नसतानाही राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा बाळगत आज शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला असल्याचे मनसेचे नेते तथा माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केले. चिपळूण पॅटर्नचा हा पक्षप्रवेशाचा झंझावात आता अख्ख्या राज्यात सुरू होणार असून परशुरामभूमीतून बदलाची सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार नितीन सरदेसाई आणि मनसेचे नेते शिरीष सावंत यांचा दोन दिवसांचा जिल्हा दौरा सुरू आहे. आज चिपळूण येथील हॉटेल अतिथी येथे आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश करून चिपळूणच्या राजकारणात रंगत आणली. धोधो कोसळणाऱ्या पावसातही शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर मनसे आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ एकच जयघोष केला.

यावेळी उपस्थित मनसैनिकांना मार्गदर्शन करताना माजी आमदार नितीन सरदेसाई म्हणाले, “आजचा दिवस चिपळूण आणि मनसेसाठी शुभ आहे. शेकडोच्या संख्येने झालेला पक्षप्रवेश ही बदलाची सुरुवात असल्याचे चित्र दिसत आहे. मुळात राजकारणाचा चिखल या राजकारण्यांनी केला असून लोकांना या राजकारणाचा वीट आला आहे. लोकांच्या अपेक्षा राजसाहेब ठाकरे यांच्याकडून आहेत. त्यामुळे राज्यभर मनसेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत.”