मुंबई : प्रभू रामचंद्रांचे आणि रामसेतूचे अस्तित्व नाकारत मंथरेलाही लाजवेल अशी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसचाच पुळका जनाब संजय राऊत यांना आला आहे. ‘मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे’ असे म्हणत राऊत यांनी एकेकाळी या आंदोलनाची खिल्ली उडवली होती. प्रभू रामचंद्रांच्या भक्तांमुळे राम मंदिर पुन्हा एकदा उभे राहिले आहे.

मंदिरासंदर्भातील कथित घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. राऊत हे आता बाबर आणि औरंगजेब यांना शरण गेल्याने त्यांना प्रभू रामचंद्रांपेक्षा रावण अधिक प्रिय वाटू लागला आहे. त्यामुळे या देशातील रामभक्त तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत, अशा शब्दांत भाजपा प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी प्रहार केला.

विकासकामांचा निधी आणि पक्षपाताबाबत संजय राऊत यांनी न बोललेलेच बरे. कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपाच्या १०५ आमदारांना मविआ सरकारने फुटकी कवडीही, दमडीही दिली नव्हती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रोज शंभर कोटी रुपये वसूल करायचे; पण महाराष्ट्राच्या तिजोरीतील एक रुपयाही एकाही भाजपा आमदाराला दिला नाही. तुमच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा विकास पूर्णपणे ठप्प झाला होता. उद्धव ठाकरे यांच्या याच कारभारामुळे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना घरी बसवले आहे, असे श्री. बन यांनी सुनावले.