लांजा:(गोविंद चव्हाण) : मोबाईलच्या युगामध्ये आज वाचन संस्कृती लोप पावत आहे. तिला गती देण्याची फार गरज आहे. नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी जास्तीतजास्त वाचन करायला हवे. मात्र वाचन झाले म्हणजे अभिनय नव्हे तर संहितेतील भाव कलाकारांच्या चेहऱ्यावर उमटायला हवे. कारण लेखकाच्या वाट्याला दुःख, व्यथा येतात आणि लेखक सत्य स्वीकारणारे असतात. त्यामुळे कलाकारांनी नाटकाला न्याय देण्याचे काम करायला हवे असे प्रतिपादन सह्याद्री श्रमिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व समीक्षक, इंग्रजी विषयाचे अभ्यासक डी डी देसाई यांनी लांजा येथे केले.
लांजा येथील युवा पत्रकार प्रविण कांबळे यांनी लिहिलेल्या ‘अंधारवाटा’ या दोन अंकी नाटकाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. ४ जुलै रोजी लोकमान्य वाचनालय लांजा येथे प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला. लोकमान्य वाचनालय लांजा येथे छोटेखानी पार पडलेल्या या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला सह्याद्री श्रमिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व व खावडी हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक, इंग्रजी विषयाचे अभ्यासक, समीक्षक डी डी देसाई हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी लांजातील संगीतकार प्रदीप कांबळे, कलारंग थिएटर्स लांजाचे अशोक कदम, लांजा वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. स्मिता उपशेट्ये, गुरव, मिथुन कांबळे, विलास कोटकर, नामदेव जाधव, सायली भोरे, चेतन जाधव, अश्विनी जोईल, सलोनी जाधव उपस्थित होते.