लांजाः(गोविंद चव्हाण) : लांजा शहरातून गेलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रकार निदर्शनास आला आहे. लांजा उपशेट्येवाडी येथे उड्डाणपुलाचा भराव कोसळू नये यासाठी भिंतीना लावलेल्या पॅरापेट्स प्लेट्स निसटल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे लांजात उड्डाणपूल कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असून हा तर जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
वरिष्ठांनी दिलेले कामाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी केलेली घाई गडबड ही येथील जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शहरातील उड्डाण पुलाच्या कामात सिमेंट काँक्रीटच्या पॅरापेट्स प्लेट ढासळत असून वरील बाजूला बनवलेला डांबरी रस्ताही खचला आहे. यासह रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. त्यामुळे लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाचे काम झटपट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. १७ वर्षाहून अधिककाळ रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम मेअखेर पूर्णत्वाला येईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार लांजा शहरात रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे.
दरम्यान, पहिल्याच मुसळधार पावसात उड्डाणपुलाच्या भारावाच्या भिंतीच्या कामाचा दर्जा ढासळत असल्याचे निदर्शनास आले आहे. लांजा शहरातील उपशेट्येवाडी येथे उभारण्यात आलेल्या भरावाच्या भिंतीच्या सिमेंटकच्या पॅरापेट्स प्लेट ढासळल्याअसल्याचा प्रकार ठेकेदार कंपनीच्या लक्षात आल्यानंतर त्याठिकाणी सिमेंट लावून त्या स्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले. यासह भरावाच्या भिंतीवर तयार करण्यात येणाऱ्या डांबरी रस्त्याची पाहणी केली असता रस्ताही एका ठिकाणी खचला आहे. रस्त्यावर भेगादेखील पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लांजा शहरात सुरू असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या उड्डाण पुलाच्या कमाबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.