लांजा : (गोविंद चव्हाण) वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे लांजा शहरासह ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर वड, आकेशी, आंबा तसेच इतर रानटी झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली.
गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रातील विविध भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लांजा तालुक्यात शेती पाण्याखाली गेली आहे. महामार्गावरील लांजा येथील नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तोपर्यंत पुलाच्या प्लेटा निसटल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक घरांवरील पत्रे वादळामुळे उडाली असून, काही घरांवर झाडे पडल्याने घरांचेही नुकसान झाले आहे.
वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. घरात आणि दुकानांत नियमित वीज मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. हजारो रुपयांची वीजबिले भरूनही नागरिकांना पुरेशा प्रमाणात वीज मिळत नाही. रात्रंदिवस वीजपुरवठा खंडित होत असून, दिवसभरात शेकडो वेळा वीज जाते. दिवसभर शेतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना रात्री अंधारातच कामे करावी लागत आहेत. एवढेच नव्हे, तर मोबाईल चार्ज करण्यासाठीही वीज उपलब्ध नसते. वीज नसल्यामुळे नळांना पाणीही येत नाही. टीव्ही, फ्रिज, पंखा, पिठाची चक्की, मिक्सर यांसारखी वीजेवर चालणारी उपकरणे निरुपयोगी ठरत आहेत. केवळ वीजबिले भरण्यासाठीच वीज घ्यायची का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, वीज मंडळाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.