मुंबई : राज्यातील १५ हजार ६३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उत्सुक असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना आणि आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली असली, तरी मतदारयादीच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) प्रक्रियेमुळे या निवडणुका थेट २०२७ मध्ये होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, सध्या राज्यात मतदारयादीचे विशेष पुनरीक्षण सुरू आहे. या प्रक्रियेत मृत, स्थलांतरित आणि अपात्र मतदारांची नावे वगळून अचूक व पारदर्शक मतदारयादी तयार करण्यावर भर दिला जात आहे. ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
यानंतर प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने खर्ची पडणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा प्रत्यक्ष कार्यक्रम २०२७ च्या सुरुवातीलाच जाहीर होण्याची चिन्हे आहेत.
२०२४ आणि २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.