नाशिक : यशवंतराव चव्हाण यांचा हा महाराष्ट्र आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी काम केले आहे. कायदा केला, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. २१व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगात आपण पुढे आहोत. अंधश्रद्धा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. दुर्दैव हे आहे की, महिला बुवाबाजीमध्ये भरडल्या जात आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सोशल मीडियावर आमची चेष्टा केली जाते. लोकप्रतिनिधींना आज ‘कमोडिटी’सारखेच पाहिले जात आहे. हे अस्वस्थ करणारे आहे. यासाठी मी संसदेच्या आगामी अधिवेशनात एक खासगी विधेयक आणणार आहे. या विधेयकानुसार, जर तुम्ही एखाद्या पक्षाकडून निवडून आलात, तर तुम्हाला पाच वर्षे पक्ष बदलता येणार नाही. जर पक्ष बदलायचा असेल, तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून या. संविधानाच्या चौकटीत बदल व्हायला हवा, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझा पृथ्वीराज बाबांशी फक्त माझ्या लेकीच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी संपर्क झाला होता. त्यांना आमचा कोणता खासदार भेटला, हे मला माहीत नाही. आमचा कोणताही खासदार बाहेर जाऊन उलटसुलट बोललेला नाही. आमचा पक्ष एकसंध आहे. अमोलदादा त्यांच्या शैलीत बोलले होते, मात्र त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्याकडे सध्या लग्नकार्य सुरू आहे. पहिले युगेंद्र, त्यानंतर जय, मग रेवती आणि आता पार्थ पवार याचे लग्न आहे. पवारांच्या मुलांनी ठरवले आहे की, यंदा बँड वाजवायचाच. अजून एक गोड बातमी आहे, ती तुम्हाला लवकरच कळेल, असेही त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतातील कष्टकरी गरीब लोकांना न्याय का मिळत नाही, तर इतरांना सूट का मिळते? महाराष्ट्रात आणि देशात सध्या तीन मोठी संकटे आहेत. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात अमली पदार्थांच्या सेवनाच्या प्रमाणात राज्यात प्रथम क्रमांक आहे. युवा पिढी त्यामध्ये भरकटत चालली आहे. पोलिसांची भीती राहिलेली नाही. एखादा नगरसेवक डॉक्टरांवर हात उचलत असेल, तर तो नगरसेवक असता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.