लांजा (गोविंद चव्हाण) : लांजा नगरपंचायत क्षेत्रातील मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आणि शहराचा कायापालट करण्यासाठी तब्बल २० कोटी रुपयांच्या (रु. २००० लक्ष) विकासकामांना राज्य शासनाकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. स्थानिक आमदार किरण भैया सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि विशेष प्रयत्नांमुळे हा अवाढव्य निधी मंजूर झाला असून, यामुळे लांजा शहर विकासाला मोठी गती मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत आज, १३ जुलै २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. लांजा शहरात नवीन प्रशासकीय इमारत बांधणे, सुसज्ज उद्याने व जलस्रोत विकसित करणे, स्मशानभूमी व कब्रिस्तानचा आधुनिक विकास करणे आणि शाळा, अंगणवाडी व समाजमंदिर उभारणे यासारख्या महत्वपूर्ण कामांचा यामध्ये समावेश आहे.
आमदार किरण भैया सामंत यांच्या प्रयत्नांचे फळ:
लांजा शहरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागण्या आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आमदार किरण भैया सामंत यांनी या विविध विकासकामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी या सर्व कामांसाठी एकत्रित २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या मंजुरीबद्दल लांजा परिसरातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी आमदार किरण भैया सामंत यांचे जाहीर आभार मानले असून शहरात उत्साहाचे वातावरण आहे.