दापोली ( वार्ताहर ) : तालुक्यातील मळे गावात ४ जुलै ते १२ जुलै या दरम्यानच्या कालावधीत तब्बल ९ दिवस विद्युत पुरवठा खंडित होता. त्यानंतर सततच्या पाठपुराव्यामुळे आणि ग्रामस्थांनी केलेल्या मदतीमुळे नऊ दिवसानंतर विज पुरवठा पूर्ववत करण्यात आला मात्र सुरू करण्यात आलेला विद्युत पुरवठा सतत खंडीत होण्याची मालिका पुन्हा सुरू झाल्याने अनियमित विदयुत पुरवठ्याच्या या प्रकाराला कंटाळलेले मळे येथील ग्रामस्थांनी अखेर दापोली येथील विदयुत महावितरण कंपनीचे कार्यालयावर धडक दिली. याचे नेतृत्व शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे दापोली तालुकाप्रमुख श्री ऋषिकेश गुजर यांनी केले.
यावेळी श्री. गुजर यांनी जालगाव विभागाचे असिस्टंट इंजिनिअर श्री. वैभव सिंग यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांना निरुत्तर केले. पुढील दोन दिवसांत विदयुत पुरवठा सुरळीत आणि विना खंडीत सुरू झाला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल. आंदोलना दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला विद्युत महावितरणच जबाबदार असेल असा थेट इशाराच त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी शिवसेना दापोली शहर प्रमुख आणि नगरसेवक श्री संदीप चव्हाण , शिवसेना शहर समन्वयक श्री. प्रदिप गमरे या शिवसेना पदाधिकाऱ्यांसह मळे येथील श्री . शशिकांत फिलसे, श्री. संतोष फिलसे, श्री.अजय फिलसे , श्री.संदेश गोसावी, श्री .प्रवीण पांदे , श्री.विनोद पांदे , श्री.अजय बोवने , श्री.प्रितेश तेलप तसेच आगरवायंगणी येथील श्री. विक्रम पवार हे उपस्थित होते.
दापोली तालुक्यातील मळे येथे ४ जुलै ते १२ जुलै या दरम्यानच्या कालावधीत ९ दिवस विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित होता. येथील ग्रामस्थांनी विद्युत महावितरणकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे खंडीत विद्युत पुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यात आला मात्र तो नव्याची नवलाईच ठरला. कारण दुसऱ्या दिवसापासूनच पुन्हा विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला. ही परिस्थिती लक्षात घेवून बुधवारी येथील ग्रामस्थांनी दापोली येथील विदयुत महावितरण कंपनीचे कार्यालय गाठले . यावेळी शिवसेना दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी त्यांना मोलाची साथ देत त्यांची ती समस्या आपली समजून खंडीत तसेच अनियमित विदयुत पुरवठ्याबाबत जालगाव सेक्शन अधिकारी श्री . वैभव सिंग यांना मळे तसेच मळे परिसरात भेडसावणाऱ्या विद्युत समस्यांची आपबिती कथन करत प्रश्नांचा भडीमार करुन भंडावून सोडले.
