चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध वैद्य निमिष बापट प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर संस्थेचे सहकार्यवाह श्री. विनोद फणसे, शाळा समिती अध्यक्ष श्री.तुषार गोखले, शाळा समिती सदस्या सौ. सारिका भावे या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
युनायटेड इंग्लिश स्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी स्वरांगी प्रमोद जोशी माध्यमिक शालांत परीक्षेत ९९ टक्के गुण प्राप्त करून शाळेत तसेच तालुक्यामध्ये पहिली आली. त्यामुळे शाळेतील पारितोषिक वितरणाला स्वरांगी तब्बल ५४ बक्षिसांची मानकरी ठरली. शाळेमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला मिळणारी सर्व बक्षिसे, विषयानुसार प्रथम क्रमांकाला मिळणारी सर्व बक्षिसे स्वरांगीने तिच्या मेहनतीने मिळवली. यासाठी सर्व मान्यवरांनी तिचं विशेष कौतुक केलं.आपल्या मनोगतामध्ये स्वरांगीने तिला घडवणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वेगवेगळ्या स्पर्धांच्या वेळी शिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच आपण राज्यस्तरावर उत्तम यश मिळवू शकलो. सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारही मिळाला. शालांत परीक्षेत उत्तम गुण मिळाले. यासाठी आई-बाबांबरोबरच शिक्षकांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे. सर्वच शिक्षकांनी केलेले उत्तम संस्कार मी कायम लक्षात ठेवीन असे तिने सांगितले.
चिपळूण अर्बन बँक, चतुरंग प्रतिष्ठान, ब्राह्मण सहाय्यक संघ, परिमल ग्रुप, गोपाळकृष्ण देवस्थान पाग, चिपळूणमधील वेगवेगळ्या संस्था यांनीही स्वरांगीचा सत्कार करून तिचं अभिनंदन केलं.चिपळूणमधील अनेकजणांनी घरी येऊन स्वरांगीचे कौतुक केले.
स्वरांगी ५ वी आणि ८ वीच्या स्कॉलरशिप परीक्षेत पहिली येऊन गुणवत्ता यादीत झळकली होती. कालिदास विद्यापीठ संस्कृत गुणवत्ता शोध परीक्षेत स्वरांगीने राज्यस्तरावर पाचवा रँक मिळवला.तिच्याकडे असलेल्या उत्तम वक्तृत्व कौशल्याने तिने राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाची अनेक पारितोषिके पटकावली. अभ्यास, वक्तृत्व,चित्रकला ,नृत्य, नाट्य, अभिनय अशा सर्वच क्षेत्रांमध्ये तिने मिळविलेल्या प्राविण्‍यामुळे यावर्षीचा चतुरंग प्रतिष्ठानचा मानाचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार तिला मिळाला. स्वरांगी सध्या अकरावी विज्ञान शाखेत शिकत असून पुढे आयआयटी मधून इंजिनियर करण्याचा तिचा मानस आहे. तिने माध्यमिक शालांत परीक्षेत मिळवलेल्या सुयशाबद्दल परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. बनसोडे सर, उपमुख्याध्यापिका कारदगे मॅडम,पर्यवेक्षक श्री. मुंढेकर सर, श्री. खाडे सर, वर्ग शिक्षिका चितळे मॅडम आणि सर्वच शिक्षकांनी तिचं खूप अभिनंदन केले आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.