चिपळूण : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त चिपळूण येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर येत अजितदादा पवार यांच्या कार्याला भावपूर्ण अभिवादन केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पवन तलाव मैदान परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. आपल्या मनोगतात अनेक वक्त्यांनी अजितदादा पवार यांनी राजकारणात पक्षीय भेदभाव न करता सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी केलेले कार्य, प्रशासनातील त्यांची निर्णयक्षमता, विकासाभिमुख दृष्टी आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैली यांचे स्मरण केले. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

यावेळी ठाकरे शिवसेनेचे नेते तथा आमदार भास्कर जाधव, विधान परिषदेचे भाजप आमदार प्रमोद जठार, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम, चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, चिपळूण नगर पालिकेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य जयंद्रथ खताते, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका दिशा दाभोळकर यांच्यासह पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरसेवक तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीला अभिवादन करताना पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारीही समाजाने स्वीकारावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सर्वपक्षीय सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, राजकीय मतभेद बाजूला ठेवत एका लोकप्रिय नेत्याच्या स्मृतीला वाहिलेली ही आदरांजली उपस्थितांच्या मनाला भावून गेली.