चिपळूण : “आमच्या गाड्या रद्द करून परराज्यातील गाड्यांना प्राधान्य का देण्यात आले?” असा सवाल उपस्थित करत मनसेने रेल्वे प्रशासनावर टीका केली आहे. कोविड काळात रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या आजपर्यंत सुरू झालेल्या नाहीत. महाराष्ट्रातील कोकणातील प्रवाशांची गैरसोय होत असताना परराज्यातील प्रवाशांचे लाड पुरवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दादर पॅसेंजरऐवजी गोरखपूर गाडी सुरू करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे. कोकणवासीय आणि महाराष्ट्रातील जनतेला डावलून परराज्यातील प्रवाशांना प्राधान्य दिले जात असेल, तर ते सहन केले जाणार नाही. सध्या निवेदन देत आहोत; मात्र त्याची दखल घेतली नाही, तर उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या धावू देणार नाही, असा आक्रमक इशारा मनसेने दिला आहे.
।। दादर पॅसेंजर झाली गोरखपूर ।।
कोकणात धावणारी दादर पॅसेंजर गाडी रेल्वे प्रशासनाने बंद करून परराज्यातील प्रवाशांसाठी गोरखपूर गाडी सुरू केली आहे. तसेच कोविड काळात मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, मुंबई-मडगाव गोदावरी एक्सप्रेस, पुणे-भुसावळ पॅसेंजर, पंढरपूर एक्सप्रेस यांसारख्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने कोकण आणि महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
।। मोठी गैरसोय ।।
रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या बंद करून त्यांच्या ऐवजी परराज्यात जाणाऱ्या गाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे कोकण आणि महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांचा विचार करण्याऐवजी येथील रेल्वे प्रशासन परराज्यातील प्रवाशांना सेवा-सुविधा पुरवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
।। मनसे आक्रमक ।।
कोकण आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता मैदानात उतरली आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने आज महाव्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन दिले. मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून निवेदन सादर केले. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
।। हे खपवून घेतले जाणार नाही ।।
कोकणवासीय आणि महाराष्ट्रातील जनतेला डावलून परराज्यातील प्रवाशांना प्राधान्य दिले जात असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. महाराष्ट्र आणि कोकणवासीयांवर होणारा अन्याय मनसे कदापिही सहन करणार नाही, असा इशारा देण्यात आला.
।। उत्तरेकडे एकही गाडी जाऊ देणार नाही ।।
याद राखा, जर पंधरा दिवसांत रेल्वे प्रशासनाने गाड्या पुन्हा सुरू केल्या नाहीत, तर उत्तरेकडे एकही गाडी जाऊ देणार नाही. मनसैनिकांसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनता रेल्वेमार्गावर उतरेल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला. महाव्यवस्थापकांसमोर निषेध व्यक्त करत तीव्र नाराजीही नोंदवण्यात आली.
।। मनसैनिक आणि जनता कोणत्याही थराला जाईल ।।
महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रावर अन्याय चालणार नाही. या अन्यायाविरोधात मनसैनिक आणि महाराष्ट्रातील जनता कोणत्याही थराला जाईल, याची दक्षता घ्यावी, असा इशारा यावेळी देण्यात आला.
