चिपळूण : विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी केलेली टीका ही वस्तुस्थितीपासून दूर, दिशाभूल करणारी आणि कोकणाच्या जनभावनांचा अपमान करणारी आहे. कोकणातील जनता विकासविरोधी नाही; मात्र विनाशकारी, पर्यावरणाला घातक आणि स्थानिकांच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या प्रकल्पांविरोधात ती ठामपणे उभी आहे आणि राहील, अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिपळूण शहरप्रमुख श्री. सचिन उर्फ भैया कदम यांनी मांडली.

रिफायनरी प्रकल्पामुळे दोन लाख रोजगार गेले, असा दावा करणाऱ्यांनी प्रथम लोटे परिसरातील वास्तव पाहावे. तेथे सुरू असलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या उद्योगामुळे स्थानिक नागरिकांना कर्करोगासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. PFAS सारख्या घातक रसायनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांविषयी भाजपची आणि आमदार प्रमोद जठार यांची नेमकी भूमिका काय आहे, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे. रोजगाराच्या नावाखाली कोकणातील जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कुणालाही नाही.

कोकण किनारपट्टी ही कोणाची कचरापट्टी नाही. गोड-गोड भाषणे करून कोकणातील जनतेला फसविण्याचे दिवस आता संपले आहेत. सरकारने कोकणाच्या जनभावना, पर्यावरणीय संवेदनशीलता, शेती, मासेमारी, पर्यटन आणि स्थानिकांच्या अस्तित्वाचा गांभीर्याने विचार करावा. जीवनमान बाधित होणार नाही, असे पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकास मॉडेल स्वीकारावे.

विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्प, प्रदूषणकारी रिफायनरी आणि स्थानिकांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या प्रकल्पांविरोधात आमची भूमिका ठाम होती, आहे आणि राहील, असेही श्री. सचिन उर्फ भैया कदम यांनी स्पष्ट केले.