पनवेल (वैभव लबडे) : ग्रामीण भागाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाची इमारतच आता मृत्यूचा सापळा बनू लागली आहे. पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खानावळे येथील कार्यालयाची इमारत अत्यंत जुनी आणि जर्जर झाली असून, इमारतीच्या भिंतींना आणि छताला मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत.
या अत्यंत धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतीत ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि पदाधिकारी दररोज आपला जीव मुठीत धरून काम करत आहेत.
गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ झालेल्या या बांधकामाची योग्य ती दुरुस्ती किंवा पुनर्विकास न झाल्यामुळे इमारतीची अवस्था बिकट झाली आहे.
कार्यालयाच्या मुख्य भिंतींवर, दारे-खिडक्यांच्या चौकटींजवळ आणि छताच्या कोपऱ्यांमध्ये खोल आणि लांबवर गेलेले तडे पडले आहेत.
या कार्यालयात विविध दाखल्यांसाठी आणि कामांसाठी नागरिक येत असतात.
मात्र, इमारतीची ही दुरवस्था पाहून कर्मचारी आणि नागरिक दोघांच्याही मनात सतत भीतीचे सावट असते. “कधी कोणती भिंत किंवा छत अंगावर येईल याचा नेम नाही,” अशी भीती येथील कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने आणि वरिष्ठ जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी या इमारतीच्या धोकादायक स्थितीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून, तात्काळ नवीन इमारतीचे बांधकाम किंवा पर्यायी जागेत कार्यालय स्थलांतरित करावे, अशी मागणी आता खानावळे येथील ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
