लांजा: पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने लांजा नगरपंचायतीच्या ६५.७७ कोटींचा महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून याबाबत पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांचे लांजा नगरपंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी त्यांची सदिच्छा भेट घेत आभार मानले.
सदर प्रकल्पामुळे लांजा शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि शाश्वत होणार असून नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत २.० अभियानांतर्गत नगरविकास विभागाने या निधीची मंजुरी दिली असून प्रकल्पाचे काम १२ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. लांजा शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या योजनेची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
▪️आधुनिक पाणीपुरवठा व्यवस्था…
या प्रकल्पांतर्गत लांजा शहरासाठी आधुनिक जलपुरवठा व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये पन्हळे धरण आणि बेनी नदी येथून कच्च्या पाण्याचे उपसा केंद्र, नवीन जॅकवेल, पंपगृह, कच्च्या पाण्याची वाहिनी, ९ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प, विविध जलसाठे, उंच जलकुंभ, वितरण व्यवस्था, सौर ऊर्जा प्रकल्प, रस्त्यांची पुनर्बांधणी तसेच आवश्यक पूरक सुविधा उभारण्यात येणार आहेत.
यावेळी लांजाच्या नगराध्यक्ष सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, नगरसेवक तथा गटनेते योगेश कावतकर, पाणी सभापती रफिक नेवरेकर, पंढरीनाथ मायशेट्ये, मनोहर बाईत, सचिन डोंगरकर, वैभव जोईल, सिद्धेश भुवड तसेच नगरसेविका निधी गुरव, श्रद्धा तोडकरी, प्रांजल यादव, प्रणाली तेली, निलिमा कनावजे, साक्षी मानकर, दुर्वा भाईशेट्ये आदीं उपस्थित होते.
