चिपळूण : नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेला कथित अन्याय तसेच पेपरफुटीविरोधी आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, अभिजित दिपके आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ युवासेनेच्या वतीने गुरुवार, २३ जुलै रोजी चिपळूणमध्ये स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आले आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही या अभियानातून करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हे स्वाक्षरी अभियान गुरुवार, २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता डी.बी.जे. महाविद्यालयासमोर होणार आहे. या वेळी विद्यार्थी, युवक, पालक आणि नागरिकांच्या सहभागातून स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार असून, काळ्या फिती बांधून लाठीमाराचा निषेध व्यक्त केला जाणार आहे. तसेच विद्यार्थी-युवा आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात येणार आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी, युवक, पालक तसेच जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन युवासेनेचे तालुका अधिकारी प्रितम वंजारे आणि शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर पारदर्शक शिक्षण व्यवस्था निर्माण व्हावी आणि पेपरफुटीसारख्या प्रकारांना आळा बसावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.