चिपळूण : रोटरॅक्ट क्लब ऑफ चिपळूणच्या आरोग्य संजीवनी योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून अहोरात्र कार्य करणारे श्री. सीताराम पडते यांचा क्लबच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना “The Card Guy” हा सन्मानाचा गौरव प्रदान करण्यात आला.
आरोग्य संजीवनी योजनेअंतर्गत मोफत रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, फिजिशियन सल्ला, ईसीजी तसेच विविध आरोग्य तपासण्या व मार्गदर्शन यांचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून दिला जात आहे. ही योजना शहरापुरती मर्यादित न ठेवता गावागावांत पोहोचविण्याचे मोलाचे कार्य श्री. पडते यांनी केले आहे.
वयाची ५५ वर्षे ओलांडल्यानंतरही त्यांनी उन्हात, पावसात आणि दुर्गम भागांत जाऊन नागरिकांना आरोग्य संजीवनी कार्डांची माहिती दिली, कार्डांचे वितरण केले आणि गावोगावी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला.
मागील व चालू वर्ष मिळून त्यांनी ८,००० हून अधिक आरोग्य संजीवनी कार्डांचे वितरण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून ५० हून अधिक आरोग्य शिबिरांच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या या कार्यामुळे हजारो नागरिकांपर्यंत आरोग्यसेवेची माहिती आणि सुविधा पोहोचल्या आहेत.
यावेळी रोटरॅक्ट क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “सीताराम पडते हे केवळ कार्ड वितरित करणारे स्वयंसेवक नाहीत, तर आरोग्यसेवा आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे आरोग्य संजीवनी योजनेला खऱ्या अर्थाने जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.”
सत्कार स्वीकारताना श्री. सीताराम पडते यांनी हा सन्मान संपूर्ण रोटरॅक्ट क्लबच्या कार्यकर्त्यांचा आणि आरोग्यसेवेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचा असल्याची भावना व्यक्त केली.
रोटरॅक्ट क्लब ऑफ चिपळूणकडून श्री. सीताराम पडते यांचा विशेष सत्कार “द कार्ड गाय” निस्वार्थ समाजसेवेचा गौरव..
