श्रीवर्धन : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संपूर्ण राज्य विठ्ठलमय झाले असून, कोकणातही भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील वेळास आगर येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाचा गजर, लेझीमचा ताल आणि बालवारकऱ्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण वेळास आगर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
वेळास आगर येथील श्री गणपती मंदिरातून विठू माऊलीच्या जयघोषात दिंडीला प्रारंभ झाला. विठ्ठल-रुक्मिणीच्या नामस्मरणात, टाळ-मृदुंगाच्या तालावर आणि अभंगांच्या गजरात सर्व वयोगटांतील ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते.
या दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरला तो गावातील चिमुकल्यांचा आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी लेझीम खेळत पांडुरंगाची भजने आणि अभंग सादर केले. तर लहान मुला-मुलींनी विठ्ठलाची वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली. अनेक चिमुकल्या मुलींनी डोक्यावर तुळशीवृंदावन आणि पांडुरंगाची मूर्ती घेऊन श्री गणपती मंदिरापासून श्री कालभैरवनाथ मंदिरापर्यंतचा प्रवास भक्तिभावाने पूर्ण केला.
श्री गणपती मंदिर ते श्री कालभैरवनाथ मंदिरादरम्यान निघालेल्या या दिंडीचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ‘जय हरी विठ्ठल’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने संपूर्ण वेळास आगर गाव दुमदुमून गेले. जणू प्रत्यक्ष पंढरपूरचाच सोहळा येथे अवतरल्याचा भास उपस्थितांना होत होता.
