‎लांजा:(गोविंद चव्हाण) : शिक्षण क्षेत्रात मूल्याधारित, विद्यार्थीकेंद्रित आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणारे श्री. दिनेश बाबाजी डोर्लेकर, उपशिक्षक, जि. प. शाळा आदर्श वसाहत कारवांचीवाडी क्र. २, ता. जि. रत्नागिरी, यांना स्विफ्ट एन लिफ्ट, कोल्हापूर या संस्थेतर्फे “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२६” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार दि. २६ जुलै २०२६ रोजी आयोजित भव्य समारंभात मा आमदार विलासराव कोरे मा.आमदार श्री सतीशजी पाटील, मा.विनय गोसावी आणि मा. श्री निलेश जी साबे फाउंडर अँड सीईओ swiftNlift कोल्हापूर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
‎श्री. दिनेश डोर्लेकर गुरुजी यांनी आपल्या शिक्षक सेवेला दि. १४ ऑगस्ट २००३ रोजी जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा, मठ बुद्रुक क्र. १, ता. मालवण येथून सुरुवात केली. त्यानंतर विविध शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवड निर्माण करणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, मूल्यशिक्षण, तसेच नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली.
‎दि. ३ मे २०२३ रोजी आंतरजिल्हा बदलीने ते रत्नागिरी जिल्हा परिषद सेवेत रुजू झाले. सध्या ते जि. प. शाळा आदर्श वसाहत कारवांचीवाडी क्र. २ येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
‎यंदा त्यांच्या शिक्षक सेवेला २३ वर्षे पूर्ण झाली असून, या प्रदीर्घ सेवाकाळात केलेल्या शैक्षणिक, मूल्याधारित आणि नाविन्यपूर्ण कार्याची राज्यस्तरावर दखल घेत स्विफ्ट एन लिफ्ट, कोल्हापूर या संस्थेने त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पित सेवाभावाची आणि शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाची पोचपावती मानली जात आहे.
‎या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील सहकारी, मित्रपरिवार, माजी विद्यार्थी, पालकवर्ग तसेच विविध सामाजिक संस्थांकडून श्री. दिनेश बाबाजी डोर्लेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या गौरवात मोलाची भर पडली आहे.