मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आपल्या सहकाऱ्यांसह टिळक भवन येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

देशात लोकशाही व संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवत भाजपा सरकारचा मनमानी कारभार सुरु असून ते देशासाठी अंत्यत घातक आहे, म्हणून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठा लढा पुकारला आहे. हुकूमशाही प्रवृत्तींच्या हातून देश वाचवणे हे सर्वात महत्वाचे आहे. राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या लढाईला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. तरुण वर्गांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. राहुल गांधी यांच्या लढ्यात सहभागी होत त्यांचे हात बळकट करण्यासाठी अनेकजण काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आहेत. कॅप्टन अमोल महाडिक यांनीही तोच मार्ग निवडला असून देशाला खऱ्य़ा अर्थाने काँग्रेसचा विचार व राहुल गांधी यांचे नेतृत्वच तारू शकते हा विश्वास दृढ होत आहे. अमोल महाडिक यांना प्रोफेशनल काँग्रेस विभागात काम करण्याची संधी देण्यात येत आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षालाही फायदाच होईल”, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

“आमचे कुटुंब काँग्रेस विचाराचेच असून आजोबा दत्ताजीराव उर्फ आण्णासाहेब तटकरे हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. आज काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने घरी आल्यासारखे वाटत आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्वच देशाला तारु शकणार आहे म्हणून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, पक्ष जी जबाबदारी देईल ती समर्थपणे पार पाडेन”, असे अमोल महाडिक यावेळी म्हणाले.