मुंबई – गौरी गणपतीच्या सणासाठी मुंबईतून चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी यंदा पाच मोदी एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत अशी घोषणा राज्याचे कार्यक्षम आणि लोकप्रिय मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री.नितेश राणे यांनी केली. .

दैनिक सागरशी बोलताना ते म्हणाले की,गेल्या वर्षी दोन मोदी एक्सप्रेस सोडण्यात आल्या होत्या. तेव्हा कोकणातील चाकरमान्यांनी या उपक्रमाचे भरभरून स्वागत केलेच शिवाय चांगला प्रतिसादही लाभला होता. त्यामुळे यावर्षी गणपतीसाठी मुंबईतून पाच मोदी एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत . कोकणातील जनतेच्या अलोट प्रेमाची तुलना कशाशीही करता येणे शक्य नाही अशी भावनाही त्यांनी बोलून दाखविली.

या भेटीत मंत्री राणे यांनी आपल्या खात्याची पुस्तिका भेट स्वरूपात दिली.मुंबईमध्ये आपल्या दालनात अत्यंत मोकळेपणाने त्यांनी संवाद साधला.

बंदरे व मत्स्य विभागाच्या मच्छीमार बांधव व आम जनतेच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या बहुसंख्य कल्याणकारी योजना तसेच कोकण विकास आदी मुद्द्यांना त्यांनी परामर्श घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभारही त्यांनी मानले. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणेसाहेबांसारखे दूरदृष्टी लाभलेले नेते सातत्याने कोकणी बांधव आणि कोकण विकासाचाच विचार करीत असतात असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.