चिपळूण : मान्सूनच्या विलंबाने आणि पावसाच्या लहरीपणामुळे काहीशी रखडलेली चिपळूण तालुक्यातील भात व नाचणीची लागवड आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, तालुक्यात ९९ टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर लागवड पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांनी वेगाने कामे उरकल्यामुळे पिकांची स्थिती चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.

यंदा मान्सून उशिरा सुरू झाल्याने भातलावणीला सुरुवातीपासूनच विलंब झाला. त्यानंतर चार ते पाच दिवस पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी लावणीची कामे ठप्प झाली होती. नदीकाठच्या तसेच पाण्याची सुविधा असलेल्या भागात काही शेतकऱ्यांनी पंपाद्वारे पाणी उचलून लावणी केली, तर सिंचनाची सुविधा नसलेल्या भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, पावसाने पुन्हा जोर धरताच शेतकऱ्यांनी रखडलेली कामे वेगाने पूर्ण केली. सध्या तालुक्यात सुमारे ६,४०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भाताची, तर ५०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर नाचणीची लागवड पूर्ण झाली आहे.

गतवर्षी तालुक्यात सुमारे ७ हजार हेक्टरवर भात, तर ५९८ हेक्टरवर नाचणीची लागवड झाली होती. यंदाही जवळपास तेवढ्याच क्षेत्रावर लागवड होण्याची शक्यता कृषि विभागाने व्यक्त केली आहे.

पिकांच्या वाढीसाठी नियमित पाऊस आवश्यक
लावणीच्या काळात काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता ही वाढली होती मात्र त्यानंतर पावसाने सातत्य राखले त्यामुळे रखडलेली भात घेऊन असलेला जवळपास पूर्ण होत आली आहे कुठेही भाताची रोपे सुटली किंवा पिवळी पडली नाहीत आता पिकांच्या चांगल्या आवडीसाठी नियमित पाऊस आवश्यक आहे.