मंडणगड : तालुक्यातील कळकवणे गावातील अंगणवाडीमध्ये अपंगत्वावर मात करत अंगणवाडी सेविकांना मदतनीस म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या भारती पवार यांच्या जिद्द, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावाचा गौरव करण्यात आला. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ भारती पवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

अडचणींना न घाबरता आपल्या क्षमतेनुसार समाजासाठी योगदान देत राहणाऱ्या भारती पवार यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. त्यांच्या संघर्षातून आणि सेवाभावातून परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर समाजासाठी सकारात्मक योगदान देता येते, असा प्रेरणादायी संदेश मिळत आहे.

यावेळी बोलताना अभिजीत देवळेकर म्हणाले की, “अपंगत्व ही मर्यादा न मानता आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून समाजासाठी योगदान देणाऱ्या भारती पवार यांचा सन्मान हा त्यांच्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला प्रोत्साहन देणारा आहे. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल.”

या प्रसंगी जि. प. कळकवणे शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पाटील, जि. प. केंद्र शाळा देव्हारेचे माजी मुख्याध्यापक मोतीलाल पाटील, पदवीधर शिक्षक हेमंत पवार तसेच विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.

भारती पवार यांच्या कार्याचा झालेला हा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून जिद्द, आत्मविश्वास आणि सेवाभावाला दिलेली कौतुकाची पावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.